पणजी - मिरामार गोवा येथे आयोजित भारतातील पहिल्या आयर्नमॅन ७०.३ स्पर्धेमध्ये भारतीय सेनेतील विश्वजीत सिंग साइखोम अव्वल ठरले. या ट्रायथलॉनमधील अव्वल तीन ट्रायथलीटना न्यूझीलंडमधील विश्व आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा - रोहितच्या दमदार प्रदर्शनाने, 'या' दोन खेळाडूंची कसोटी कारकिर्द धोक्यात
भारतीय सेना दलातील २९ वर्षीय विश्वजीत सिंग साइखोम यांनी ४ तास ४२ मिनिटांत आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉन पूर्ण करत अव्वल स्थान पटकावले. भारताचे निहाल बेग दुसऱ्या आणि महेश लॉरेबम तिसऱ्या तर स्वित्झर्लंडचा पाब्लो एरट चौथ्या स्थानी राहिले. ट्रायथलॉन पूर्ण केल्यानंत साइखोम म्हणाले, 'पाब्लो एरट याला पराभूत करणे हे माझे अनेक वर्षांचे लक्ष होते. जेव्हा मी २०१५ मधील गोवा ट्रायथलॉन पूर्ण केली तेव्हा पाब्लो विजेता ठरला होता. तो मागील अनेक वर्षे सातत्याने जिंकत आला आहे. आज अंतिम रेषा पहिल्यांदा पार केल्यामुळे खूप आनंद होत आहे. गोव्यातील ट्रायथलॉनमधील हा विजय मला पुढील स्पर्धांसाठी आत्मविश्वास देणारा आहे.'
आज जेव्हा स्पर्धेला सुरुवात झाली तेव्हा भारताचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू लिखित एस.पी यांने आपल्या टीमसाठी २५ मिनिटांत १.९ किलोमीटर हे सागरी अंतर सर्वप्रथम पार केले. दरम्यान, स्वित्झर्लंडच्या नताशा बँडमनने सातव्यांदा आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉन पूर्ण केले आहे. यापूर्वी सहा वेळा ती विजेती ठरली आहे. आजच्या स्पर्धेत ती सहाव्या स्थानी राहिली.
आतापर्यंत जगभारातील ५३ देशांत आयर्नमॅन ७०.३ चे आयोजन करण्यात आले होते. तर भारतात ही स्पर्धा पहिल्यांदाच पार पडत आहे. मिरामार समुद्रामध्ये आज सकाळी साडेसात वाजता या स्पर्धेला सुरूवात झाली. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, स्पर्धा संयोजक दीपक राज आणि आयर्नमॅनचा विदेशी चमू उपस्थित होता. यामध्ये १००० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धकांमध्ये ८०० स्पर्धक भारतीय आहेत.
'आयर्नमॅन ७०.३ भारतात पहिल्यांदाच होत असताना त्याचे गोव्यात आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये २७ देशांतील ट्रायथलीट सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा गोव्यातील पर्यटनाला चालना देणारी असल्याने सरकारने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ही स्पर्धा म्हणजे माझ्यासाठी हा गौरवाचा क्षण आहे', असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे.
योस्का संस्थेचे संचालक दीपक राज यांनीही आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, 'गोव्यात पहिल्यांदाच ही स्पर्धा होत असून यामध्ये २७ देशातील ट्रायथलीट सहभागी झाले आहेत. यामध्ये १.९ किलोमीटर समुद्रात पोहणे, ९० किलोमीटर सायकलींग आणि २१ किलोमीटर धावणे असे याचे स्वरूप आहे.
'मी यापूर्वी विदेशात तीन आयर्नमॅनमध्ये सहभागी झालो होतो. ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आल्याचा खूप आनंद होत आहे. येथील आयोजन खूपच चांगले आहे. कारण भारतात रस्ता बंद करणे खूप कठीण असते', असे मत सहभागी झालेला ट्रायथलीट सौरभ अगरवालने मांडले आहे. या स्पर्धेसाठी राजधानी पणजीपासून मिरामार सर्कल ते ताळगाव पाठावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम पर्यंत रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली होती. शिवाय, सकाळपासून कडक बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
सांघिक अव्वल संघ -
दिल्लीच्या आदित्य दहिया (पोहणे), यशिष दहिया (सायकलींग) आणि पंकज धिभन (धावणे) यांच्या संघाने अव्वल स्थान पटकावले.
अव्वल दहा ट्रायथलीट -
- विश्वजीत साइखोम- भारत (04:42:44)
- निहाल बेग- भारत (04:47:47)
- महेश लॉरेंबम -भारत (04:52:04)
- पाब्लो एरट- स्वित्झर्लंड (04:56:24)
- पी. रावलू- भारत (04:57:54)
- स्कॉट विल्सन - ऑस्ट्रेलिया ((05:15:09)
- सी. व्हीलर - ग्रेट ब्रिटन ((05:23:38)
- ए. कंदीलूप्पा - भारत (05:19:38)
- एन. कुलकर्णी - भारत (05:23:29)
- डी. क्रेझीएर - फ्रान्स (05:26:50)