रोम- भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने माटिओ पॅलिकॉन रँकिंग रेसलिंग मालिकेत सलग दुसऱ्या आठवड्यात दुसरे सुवर्ण जिंकत चमकदार कामगिरी केली आहे. या सुवर्णपदकाच्या विजयानंतर तिने आपल्या वजनी गटात प्रथम क्रमाकांचे स्थान पटाकावले आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू
२६ वर्षीय विनेश टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे. तिने ५३ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात कॅनडाच्या डायना मेरी हेलन वेकरचा ४-० असा पराभव केला. पहिल्या सत्रात विनेशने आपले सर्व गुण मिळवले आणि दुसऱ्या सत्रात आपली आघाडी कायम राखत तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. गेल्या आठवड्यात विनेशने कीवमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
पुन्हा अव्वल स्थानी
विनेशने स्पर्धेत जगातील तिसर्या क्रमांकाची कुस्तीपटू म्हणून प्रवेश केला होता. आता तिने १४ गुण मिळवत पुन्हा अव्वल स्थान पटकावले आहे. या स्पर्धेपूर्वी कॅनेडियन कुस्तीपटू 40 व्या स्थानावर होती, पण आता ती दुसर्या क्रमांकावर पोहोचली आहे. विनेशने या स्पर्धेत एकही गुण गमावला नाही. तिने तिच्या तीनपैकी दोन सामन्यात प्रतिस्पर्ध्याला पराभवाची धूळ चारली. तर, भारतीय कुस्तीपटू सरिता मोरेने 57 किलोमध्ये रौप्यपदक जिंकले आहे.