शिर्डी - साईबाबा नगरीत राहता तालुका कुस्ती तालीम संघाच्या वतीने २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले.
हेही वाचा - #HBDLataDidi : 'आईची माया लावणाऱ्या लतादीदी', मास्टर ब्लास्टरने दिल्या शुभेच्छा
या स्पर्धेत देशभरातल्या २६ राज्यातील २८ कुस्ती संघानी भाग घेतला आहे. या कुस्ती संघातील ८२० मल्लांपैकी २५० खेळाडू या महिला कुस्तीपटू आहेत. स्पर्धेतील विजेत्या कुस्तीपटूंना हंगेरी येथे होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे.
भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष व उत्तरप्रदेशचे खासदार ब्रिजभूषण चरणसिंग आणि राज्य कुस्तीवीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे हे या स्पर्धेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विविध किलो वजनाच्या १० गटातुन मॅटवरच्या कुस्तीची ही स्पर्धा तीन दिवस रंगणार आहे.
फ्रि स्टाईल कुस्ती गटात ५७ किलो पासुन ते १२५ किलो वजनी गटातील मल्लांची कुस्ती लावण्यात आली. तर, गिरक्रोमन स्टाईलमधुन ५५ किलो वजनी गटापासुन ते १३० किलो वजनी गटाच्या कुस्त्या लावण्यात आल्या आहेत. मुलींमध्ये ५० किलो वजन गट ते ७६ किलो वजन गटातील कुस्त्याही पार पडणार आहेत.
रेल्वे आणि आर्मी या दोन संघाचा सहभाग असल्याने शिर्डीतील ही स्पर्धा लक्षवेधी ठरत आहे. या स्पर्धेत ५० पेक्षा जास्त पंच, प्रशिक्षक, कुस्ती व्यवस्थापक आपली भूमिका बजावत आहेत.