लॉसने - कोरोनामुळे यंदा होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, स्थगित झालेल्या या स्पर्धेचे भवितव्य काय असेल, हे सांगणे घाईचे ठरेल, असे आंतरराष्ट्रीय ओलंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांनी कबूल केले आहे.
आयओसीच्या 136 व्या बैठकीत बाख यांनी ही प्रतिक्रिया दिली. ही बैठक प्रथम व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. परंतु बाख यांनी असा इशारा दिला की, आरोग्याच्या बाबतीत टोकियोच्या नियोजनात अनेक परिस्थितींचा विचार केला जात आहे.
"आज आयोजन समिती आणि समन्वय आयोगाचा अहवाल यांनी काही दिशानिर्देश दिले आहेत, की ते कोणत्या दिशेने कार्य करत आहेत. परंतू या परिस्थितीत आपण अद्याप तपशीलांवर लक्ष देऊ शकत नाही. बर्याच देशांमध्ये, आपण घर सोडताना आपल्याकडे उद्यासाठी कोणत्या आवश्यकता आहेत, हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे जगातील महत्त्वाच्या या स्पर्धेची आपल्याला तपशीलवार कशी माहिती असेल? आज कोणताही तोडगा निघू शकत नाही", असे बाख यांनी शुक्रवारी बैठकीत पत्रकारांना सांगितले.
यावर्षी 24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली गेली होती, परंतु कोरोनाव्हायरसमुळे ती एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा तहकूब करण्याची घोषणा होईपर्यंत एकूण 57 टक्के पात्रता पूर्ण झाली होती. पुढच्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे.
प्रस्तावित टोकियो खेळानंतर सहा महिन्यांनी बीजिंग 2022 च्या हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन करणार आहे. टोकियोचा फायदा बीजिंगला होऊ शकतो, असा बाख यांनी पुनरुच्चार केला.