टोकियो - भारताचा राहुल जाखर टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये पी3 मिक्स्ड 25 मीटर पिस्तूल एसएच 1 इव्हेंटच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. तो पात्रता फेरीत दुसऱ्या स्थानावर राहिला. भारताचा दुसरा पॅरा नेमबाज आकाश याला अंतिम फेरी गाठता आली नाही. त्याला 20व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
राहुल जाखर प्रिसिसन राउंडनंतर 284 गुणांसह 13व्या स्थानावर होता. परंतु त्याने रॅपिड फायर सेक्शनमध्ये 292 गुण घेतले आणि 576 गुणांसह त्याने थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेतली.
चीनचा जिंग हुआंग 585 गुणांसह अव्वल स्थानावर राहिला. जिंगने प्रिसिसन राउंडमध्ये 294 तर रॅपिड राउंडमध्ये 291 गुण घेतले. याशिवाय चीनचा दुसरा नेमबाज यांग चोओ 575 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला. युक्रेनची एरिना लिआखू आठ खेळाडूंमध्ये अंतिम फेरी गाठणारी एकमेव महिला नेमबाज ठरली.
आकाशने प्रिसिसन राउंडमध्ये 278 गुणांसह 20व्या स्थानावर होता. रॅपिड राउंडमध्ये तो 273 गुण घेऊ शकला. यामुळे त्याला 20व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, भारताने टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत आतापर्यंत दोन पदकं जिंकली आहेत. अवनी लेखराने सुवर्ण तर सिंघराज याने कास्य पदकाला गवसणी घातली आहे. आता राहुल जाखरकडून पदकाची आशा आहे.
हेही वाचा - PKL Auction : भंडाऱ्याच्या आकाश पिकलमुंडेवर लाखोंची बोली, बंगाल वॉरियर्सकडून खेळणार
हेही वाचा - Tokyo Paralympics : भारताला धक्का, स्विमर सुयश जाधव ठरला अपात्र, जाणून घ्या कारण