टोकियो - भारतीय मरियप्पन थंगवेलू व शरद कुमार यांनी पुरुषांच्या उंच उडी T63 गटाच्या अंतिम फेरीत जोरदार कामगिरी केली. मरियप्पन थंगवेलूने रौप्य पदक जिंकले. तर शरद कुमार कास्य पदकाचा मानकरी ठरला. पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. दरम्यान, मरियप्पन थंगवेलू २०१६ च्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आहे.
टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये मरियप्पन थंगवेलू आणि अमेरिकेच्या सॅम ग्रीव यांच्या कडवी झुंज पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंनी 1.88 मीटरची उंच उडी मारण्यासाठी जोर लावला. पण मरियप्पन थंगवेलूला तीन प्रयत्नात 1.88 मीटर उंच उडी मारता आली नाही. तर सॅम ग्रीव याने अखेरच्या प्रयत्नात यशस्वीरित्या उंच उंडी मारली आणि सुवर्ण पदकाला गवसणी घातली. मरियप्पन थंगवेलूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. शरद कुमार १.८३ मीटर उंच उडीसह कास्य पदकाचा मानकरी ठरला.
दरम्यान, २०१६ रिओ ऑलिम्पिकमध्ये उंच उडीत मरियप्पन थंगावेलूने सुवर्णपदकाची कमाई केली होती. त्याने त्यावेळी १.८९ मीटर उंच उडी मारली होती. यावेळी देखील मरियप्पन थंगवेलू सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार होता. पण त्याला या पॅराऑलिम्पिकमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागेल. भारताचा वरुण सिंग भाटीला विनापदक परतावे लागले. त्याने रिओ ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकले होते.
हेही वाचा - Tokyo Paralympics: भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा सुमित अंतिल काय म्हणाला?
हेही वाचा - Tokyo Paralympics: मनिष, सिंगराज अंतिम फेरीत; भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या