टोकियो - भारतीय महिला हॉकी संघ, टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. राणी रामपालच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाचा, उपांत्यपूर्व फेरीत सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतीय महिला हॉकी संघ साखळी फेरीत पाच सामन्यातील दोन विजयासह ग्रुप ए मध्ये चौथ्या स्थानावर राहिला.
भारताने शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा 4-3 ने पराभव करत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले होते. या सामन्यात भारताकडून वंदना कटारिया हिने तीन तर नेहा गोयल याने 1 गोल केला.
भारताने जरी दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवला तरी भारताचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित नव्हते. आर्यलंड आणि ग्रेट ब्रिटन यांच्यातील सामन्याच्या निकालावर भारताचे भवितव्य निर्भर होतं. भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आर्यलंडचा पराभव होणं गरजेचं होतं. ग्रेट ब्रिटनने आर्यलंडचा 2-0ने पराभव केला आणि भारताचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित झालं.
भारतीय संघ ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत
भारतीय महिला संघ ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. राणी रामपालच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने हा इतिहास रचला. आतापर्यंत भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरी गाठण्यास अपयशी ठरला होता.
वंदना ऑलिम्पिकमध्ये हॅट्ट्रिक साधणारी पहिली भारतीय महिला
वंदना कटारियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात तीन गोल केले. तिने चौथ्या, सतराव्या आणि 49व्या मिनिटाला गोल करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. या कामगिरीसह ती ऑलिम्पिकमध्ये हॅट्ट्रिक गोल करणारी भारताची पहिली महिला हॉकीपटू ठरली.
हेही वाचा - Tokyo Olympics : पोरींची कमाल! रोमांचक सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने आफ्रिकेला नमवलं
हेही वाचा - Tokyo Olympics : 7 टाके पडलेले असताना देखील लढला पण हरला, बॉक्सर सतीश कुमारचा पराभव