टोकियो - भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली. शेवटच्या सेकंदापर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव केला. हरमनप्रीत सिंह याने दोन तर रुपिंदर पाल सिंह याने एक गोल केला.
पहिल्या हाफमध्ये रुपिदर पाल सिंहने 10व्या मिनिटाला गोल करत भारताला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. तेव्हा हाफच्या अखेरीस न्यूझीलंडच्या केन रसेलने गोल करत बरोबरी साधली.
दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला. भारताकडून जोरदार आक्रमण करत हरमनप्रीत सिंहने 26व्या मिनिटाला गोल करत भारताला 2-1 ने आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या हाफमध्ये न्यूझीलंडने सामन्यात वापसी करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय संघाने आपले आक्रमण आणखी वेगवान केले. यादरम्यान मिळालेल्या पेनाल्टी कॉर्नरची संधी भारताने साधली. हरमनप्रीत सिंहने 33व्या वैयक्तिक दुसरा गोल केला.
भारतीय संघ 3-1 ने आघाडीवर पोहोचला, तेव्हा न्यूझीलंडच्या संघाने गोल करण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु भारतीय बचाव फळीने त्यांचे आक्रमण थोपून धरले. पण 43व्या मिनिटाला न्यूझीलंडच्या स्टीफन जेनेस याने भारतीय बचाव फळी भेदत गोल केला.
तिसऱ्या हाफच्या अखेरीस न्यूझीलंड 3-2 ने पिछाडीवर होता. चौथ्या हाफमध्ये न्यूझीलंड बरोबरी साधेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. अशात भारताला गोल करण्याची आणखी एक संधी मिळाली. परंतु, या संधीचे सोने मनदीप सिंहला करता आले नाही. न्यूझीलंडने हा गोल रोखला. या दरम्यान, भारतीय संघाने अनेक चूका केल्या.
सामना संपण्यासाठी काही सेकंदाचा अवधी शिल्लक असताना न्यूझीलंडला एक पेनाल्टी कॉर्नर मिळाला. पण गोलकिपर श्रीजेश याने शानदार बचाव करत भारताचा विजय पक्का केला. भारतीने संघाने हा सामना 3-2 ने जिंकला. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी होणार आहे.
हेही वाचा - Tokyo Olympics 2020 Live : टोकियो ऑलिम्पिकमध्ये चीनने जिंकले पहिले पदक
हेही वाचा - Tokyo Olympics: नेमबाज एलव्हेनील आणि अपूर्वी यांना पात्रता स्पर्धेत अपयश