टोकियो - भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत भारताचे आणखी एक पदक निश्चित केलं. ती उपांत्य फेरीत पोहोचली आहे. लवलिनाचा उपांत्य फेरीतील सामना 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. दुसरीकडे भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. तिने सरळ सेटमध्ये यामागुचीचा पराभव केला. पण सिंधूचे अद्याप पदक निश्चित झालं नाही. याचे कारण आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.
भारताची बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने उपांत्य फेरीत पोहोचताच पदक निश्चित कसे केलं हा प्रश्न सद्या चर्चिला जात आहे. याचे उत्तर आहे, बॉक्सिंगमध्ये तिसऱ्या स्थानासाठी सामना खेळला जात नाही. म्हणजे उपांत्य फेरीत पराभव होणाऱ्या दोन्ही खेळाडूंना कांस्य पदक दिलं जातं. यामुळे लवलिनाचे पदक पक्के झाले आहे.
बॅडमिंटनमध्ये नियम काय सांगतो
बॅडमिंटन खेळात असे होत नाही. या खेळात कांस्य पदकासाठी सामना खेळला जातो. यामुळे सिंधूचे पदक अद्याप निश्चित झालेले नाही.
भारतीय बॉक्सर्संना या नियमाचा झाला लाभ
बॉक्सिंगच्या या नियमाच्या आधारावर बिजिंग ऑलिम्पिकमध्ये बॉक्सर विजेंदर सिंहने कांस्य पदक जिंकलं होतं. तर लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कोम याच नियमामुळे कांस्य पदकाची विजेती ठरली.
कांस्य पदकासाठी व्हायचा सामना
1948 च्या ऑलिम्पिक पर्यंत बॉक्सिंग खेळात तिसऱ्या क्रमाकांसाठी सामना होत होता. यातील विजेत्याला कांस्य पदक दिले जात होते. परंतु 1952 ऑलिम्पिकमध्ये हा नियम बदलण्यात आला. त्यानुसार उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही खेळाडूंना कांस्य पदक दिलं जातं.
हेही वाचा - कोण आहे कमलप्रीत कौर; जिच्यामुळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाच्या आशा वाढल्या
हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय थाळीफेकपटू कमलप्रीत कौरचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश!