टोकियो - भारतीय पुरूष बॉक्सर सतीश कुमार, टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या शर्यतीत आहे. सतीश आज 91 वजनी गटात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळणार आहे. सतीशने जर हा सामना जिंकला तर तो उपांत्य फेरीत पोहोचेल आणि भारताचे आणखी एक पदक निश्चित होईल.
सतीश कुमारला पडले 7 टाके
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याआधी सतीश कुमार 7 टाके पडले आहेत. जमैकाच्या रिकार्डो ब्राउन याच्याविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात सतीशला दुखापती झाली. ब्राउनच्या पंचने सतीशची हनुवटी आणि डाव्या डोळ्यावरिल भाग फाटला होता. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंह यांनी सांगितलं की, 'मी शनिवारी सतीशला भेटलो आहे. डॉक्टरांनी त्याला रिंगमध्ये उतरण्याची परवानगी दिली आहे.'
सतीशचा आजचा सामना उज्बेकिस्तानच्या बखोदिर जालोलोव याच्याशी होणार आहे. उज्बेकिस्तानचा हा खेळाडू सद्याचा विश्वविजेता आणि आशियाई चॅम्पियन आहे. जालोलोव याने अजरबैजानच्या मोहम्मद अब्दुल्लायेव याचा 5-0 ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सतीश जर बखोदिरवर भारी पडला तर त्याचे एक पदक निश्चित होईल.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकसाठी भारताच्या पाच पुरूष बॉक्सर्संनी कोटा मिळवला होता. यात सतीश वगळता सर्व बॉक्सर ऑलिम्पिकमधून बाहेर पडले आहेत. स्टार बॉक्सर अमित पांघलचा 52 किलो वजनी गटात पहिल्याच फेरीत पराभव झाला.
लवलिना बोर्गोहेनने पदक केलं निश्चित
भारतीय महिला बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिने 69 वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे. तिने या कामगिरीसह भारताचे एक पदक निश्चित केलं आहे. लवलिना शिवाय पूजा राणी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली होती. पण तिचे आव्हान चीनच्या ली कियान हिने 5-0 ने संपुष्टात आणले.
हेही वाचा - Tokyo Olympics : सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले; उपांत्य फेरीत पी. व्ही. सिंधूचा पराभव