टोकियो - जपानसह संपूर्ण जगामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असून यामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा वर्षभरात लांबणीवर टाकण्यात आली आहे. अशात पुढील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये देखील टोकिओ ऑलिम्पिकचे आयोजन शक्य नाही, असे संकेत खुद्द टोकियो ऑलिम्पिक समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुटो यांनी दिले आहेत.
मुटो यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं, 'टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा १६ महिन्यांनी लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण असे असले तरी पुढील वर्षी जुलै किंवा त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन शक्य आहे, असे मला वाटत नाही. सद्य घडीला आम्ही कोणतेही स्पष्टीकरण देण्याच्या मन:स्थितीत नाहीत.'
आम्ही ऑलिम्पिकसाठी कसून तयारी करत आहोत. कोरोनावर नियंत्रण मिळून पुढील वर्षी ऑलिम्पिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन व्हावे, ही आमची इच्छा आहे. पर्यायी योजना शोधण्यापेक्षा आम्ही आमचे प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असेही मुटो यांनी सांगितले.
दरम्यान, जपानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५ हजारवर पोहोचली आहे. तर १०० हून अधिक जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे हे या आठवडय़ात देशात आणीबाणी जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण देशावर मर्यादा लादल्या जाणार आहेत.
हेही वाचा - देशासाठी काय पण! कोरोना विरूद्धच्या लढ्यासाठी १५ वर्षीय खेळाडूने उचलले 'हे' पाऊल
हेही वाचा - क्रीडा क्षेत्रातून दु: खद बातमी, कोरोनामुळे महान क्रीडापटूचे निधन