टोकियो - दीपिका कुमारी आणि महाराष्ट्राचा प्रविण जाधव या मिश्र दुहेरी तिरंदाजी जोडीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केली. दीपिका-प्रविणची जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. या जोडीने चीनच्या जोडीचा पराभव केला.
दीपिका कुमारी आणि प्रविण जाधव ही जोडी खेळात सुरूवातीला 1-3 ने पिछाडीवर होती. परंतु खेळाच्या मध्यात दीपिका-प्रविणने 3-3 अशी बरोबरी साधली. अखेरीस त्यांनी बॅक टू बॅक 10 गुणांची कमाई करत चीनच्या जोडीचा पराभव केला. दीपिका प्रविण या जोडीने हा सामना 5-3 अशा फरकाने जिंकला.
भारतीय जोडी उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. त्यांचा सामना या फेरीत कोणत्या जोडीशी होणार हे अद्याप निश्चित नाही. परंतु भारतीय जोडीचा हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 4 मिनिटांनी होईल.
महिला वैयक्तिकमध्ये दीपिका 9व्या स्थानी
पहिल्या दिवशी युमेनोशिमा पार्कमध्ये झालेल्या सामन्यात, भारताची स्टार महिला तिरंदाज दीपिका कुमारी सिंगल रिकर्व रॅकिंग राउंडमध्ये नवव्या स्थानावर राहिली. जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या दीपिकाने 663 गुण घेतले. पहिल्या हाफमध्ये 334 तर दुसऱ्या हाफमध्ये तिने 329 इतके गुण मिळवले. तिने 72 संधीमध्ये 30 वेळा परफेक्ट 10 गुण घेतले.
कोरियाच्या तिरंदाजांचा दबदबा -
टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्या दिवशी कोरियाच्या तिरंदाजांचा दबदबा राहिला. पहिल्यी तीन स्थानावर कोरियन तिरंदाजांनी बाजी मारली. यात 20 वर्षीय अन सान 680 गुणांसह पहिल्या स्थानावर राहिली. हा ऑलिम्पिकमधील एक रेकॉर्ड बनला आहे. याआधी तिरंदाजाला 673 स्कोर करता आला होता. विश्व रेकॉर्ड कांग चेइ वोंग हिच्या नावे असून तिने 692 गुण घेतले होते. जांग मिनही 677 गुणांसह दुसऱ्या तर कांग चेइ वोगंग 675 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिली.
दीपिका कुमारीचा वैयक्तिक गटात भूटानच्या कर्माशी होणार सामना
दीपिका कुमारीचा पुढील फेरीत सामना भूटानच्या कर्मा हिच्याशी होणार आहे. कर्माने आज 616 गुणासंह 56 वे स्थान मिळवले. एलिमिनेशन फेरीचे सामने 27 जुलै रोजी होणार आहेत.
रॅकिंग राउंडमध्ये क्रमवारी ठरते -
रॅकिंग राउंडमधील कामगिरीनुसार, क्रमवारी तसेच विरोधी खेळाडू ठरतो. तिरंदाजांना 70 मीटरच्या अंतरावरुन निशाना लावावा लागतो. यात त्यांना 72 तीर दिले जातात. दरम्यान, टोकियो टेस्ट टूर्नामेंट 2019 मध्ये दीपिकाला पराभूत करणारी कोरियाची अन सान हिने 36 वेळा 10 गुण घेतले होते.
हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय पुरूष हॉकी संघाची विजयी सलामी
हेही वाचा - Tokyo Olympics 2020 Live : टोकियो ऑलिम्पिकमध्ये चीनने जिंकले पहिले पदक