टोकियो - कोरोना विषाणूच्या फैलावामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे वरिष्ठ सदस्य डिक पौंड यांनी दिली आहे. तथापि, ही स्पर्धा कधी होईल, याबद्दल पौंड यांनी सांगतले नाही. पण याचे आयोजन २०२१ या वर्षात करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे फुटबॉल, टेनिस, क्रिकेट, बास्केटबॉल असो की, हॉकी सर्व खेळाच्या स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. टोकियो ऑलिम्पिकवरही कोरोनाचे सावट होते. यामुळे जागतिक खेळाडू संघटनने ऑलिम्पिक पुढे ढकलण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. तर कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाने कोरोनाच्या धोक्यामुळे आपले खेळाडू ऑलिम्पिकसाठी जपानला पाठवणार नसल्याचे सांगितले होते. याकारणाने, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेवर दडपण वाढले होते.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे वरिष्ठ सदस्य डिक पौंड यांनी दावा केला आहे की, टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्यात आले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी २०२१ मध्ये घेण्यासंबधी निर्णय घेणे बाकी आहे.
डिक यांच्याआधी कोरोना विषाणूचा प्रसार असाच वाढत राहिला, तर टोकियो ऑलिम्पिक पुढे ढकलण्याशिवाय, कोणताच पर्याय राहणार नसल्याचे, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सांगितले आहे.
डिक पौंड हे कॅनडाचे नागरिक आहेत. महत्वाचे म्हणजे, कॅनडाने सर्वात प्रथम ऑलिम्पिकमध्ये आपले खेळाडू सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, ऑलिम्पिक पुढे ढकलण्याच्या वृत्ताला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने दुजोरा दिलेला नाही.
हेही वाचा - Corona Virus : ..तर ऑलिम्पिक पुढे ढकलण्याशिवाय पर्याय नाही, जपानने दिले 'हे' संकेत
हेही वाचा - कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी 'पठाण' बंधू सरसावले, केली 'ही' मदत