नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षासाठी स्थगित झाल्यामुळे सर्व परदेशी प्रशिक्षकांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आला आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (एसएआय) गुरुवारी ही माहिती दिली. नवीन परदेशी प्रशिक्षकांचा कार्यकाळ चार वर्षे असेल, असे प्राधिकरणाने सांगितले आहे.
"प्रशिक्षकाला त्याच्या कामगिरीवर आणि संबंधित महासंघाच्या शिफारसीच्या आधारे चार वर्षांची मुदत दिली जाईल. करार चार वर्षांचा असेल परंतु दरवर्षी त्याचा आढावा घेतला जाईल आणि प्रशिक्षकाच्या एकूण कामगिरीच्या आधारे कार्यकाळ वाढवण्यात येईल", असे प्राधिकरणाने म्हटले.
बहुतेक परदेशी प्रशिक्षकांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2020 पर्यंत होता. क्रीडामंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "प्रशिक्षक हा खेळाचा कणा आहे. आमच्या खेळाडूंसाठी योग्य प्रशिक्षणाची व्यवस्था केल्यास ऑलिम्पिकसह आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी करण्याची शक्यता वाढते."
भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे अध्यक्ष (आयओए) नरिंदर बत्रा यांनी प्राधिकरणाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, "क्रीडामंत्र्यांसमवेत नुकत्याच झालेल्या बैठकीत अनेक एनएसएफने हा मुद्दा उपस्थित केला होता आणि परदेशी प्रशिक्षकांसाठी दीर्घ कराराबद्दल चर्चा केली होती."
ते म्हणाले, "या निर्णयामुळे खेळाडूंना मदत करण्यास बरीच मदत होईल. विशेषत: अशा वेळी जेव्हा ते सक्तीची विश्रांती घेतात. सध्याचे प्रशिक्षक खेळाडूंना ओळखतात आणि त्यांना मदत करू शकतात."