उडुपी - व्यायामाचा विचार केला तरी अनेकांना दमायला होते. त्यात योगासन म्हटले की आणखीनच कठीण व्यायाम प्रकार. चक्रासन हे योगासन करताना भल्याभल्यांची दमछाक होते. मात्र, या योगासनात १०० मीटरची रेस एका १० वर्षीय मुलीने चक्क १ मिनिट १४ सेकंदांमध्ये पूर्ण केली आहे. या रेसनंतर कर्नाटकच्या उडुपीमधील तनुश्रीच्या नावावर आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद झाली आहे.
चक्रासनामध्ये १०० मीटर रेस अत्यंत कमी वेळात पूर्ण करून तिने जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. यापूर्वी हा विक्रम हिमाचल प्रदेशच्या समिक्षा डोगराच्या नावावर होता. समिक्षाने चक्रासनामध्ये १०० मीटर रेस पार करण्यासाठी ६ मिनिटांचा वेळ नोंदवला होता.
हेही वाचा - नमस्ते ट्रम्प : भारत-अमेरिकेदरम्यान होणार महत्त्वाचे सुरक्षा करार..
योगासनामध्ये तनुश्रीने यापूर्वी चारदा जागतिक विक्रम केला आहे. २०१७ मध्ये निरालांबा पूर्ण चक्रासन हा योग प्रकार एका मिनिटात १९ वेळा करून तिने जागतिक विक्रम केला होता. १ मिनिट २४ सेकंदांमध्ये डोके आणि छाती स्थिर ठेवून उर्वरित अवयव ४२ वेळा हलवण्याचा विक्रमही तिने २०१८ साली केला होता. तिच्या या योगासनाची नोंद 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही करण्यात आली होती. २०१९ मध्ये याच योग प्रकारात तिने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला होता. त्यानंतर तनुश्रीने भानुर योगासन १ मिनिट ४० सेकंदांमध्ये ९६ वेळा करून आणखी एका जागतिक विक्रमाला गवसणी घातली होती. तिच्या या कामगिरीमुळे तिला रोमच्या इटलीमध्ये योग चिकित्सकांसह योगासन करण्याची संधी मिळाली आहे. तनुश्री योगाबरोबरच नृत्य आणि अभिनयातही निपूण आहे. ती सध्या भरतनाट्यमचा सराव करीत आहे.