तामिळनाडू - भारताचा बुद्धिबळपटू जी. आकाश हा देशाचा 66वा ग्रँडमास्टर ठरला आहे. तर, गोव्याचा अमेया ऑडी आंतरराष्ट्रीय मास्टर ठरला आहे. जागतिक बुद्धिबळ महासंघाने (एफआयडीई) नुकत्याच झालेल्या बैठकीत आकाशच्या ग्रँडमास्टर किताबाची माहिती दिली.
आकाशचे एफआयडीई रेटिंग 2495 आहे. तो म्हणाला, ''ग्रँडमास्टर झाल्याचा मला आनंद आहे. माझे हे रेटिंग 2600 पर्यंत वाढवण्याचे ध्येय आहे. ग्रँडमास्टर ऑफ इंडियाच्या यादीमध्ये स्थान मिळाल्याचा मला आनंद आहे. माझ्यासाठी हा एक खास क्षण आहे. मी कठोर परिश्रम करत राहीन.''
जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 2021 पर्यंत स्थगित -
जागतिक बुद्धिबळ संघटनेने (एफआयडीई) यावर्षी डिसेंबरमध्ये होणारी जागतिक बुद्धिबळ स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला आपले जेतेपद टिकवून ठेवण्यासाठी पुढच्या वर्षापर्यंत थांबावे लागणार आहे. यावर्षी 20 डिसेंबरपासून दुबई येथे ही स्पर्धा सुरू होणार होती. मात्र, कोरोनाव्हायरसचा धोका लक्षात घेता ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.