पुणे - मनात जिद्द आणि सोबत कुटुंबाचा पाठिंबा असेल तर एक सामान्य मुलगी काहीही करू शकते याचे उदाहरण काजल भोर या विद्यार्थीनीने घालून दिले आहे. गावच्या मातीपासून सुरू झालेला प्रवास देशपातळीपर्यंत नेण्यात तिला यश आले. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत काजल भोरच्या नेतृत्वाखाली भारतीय खो-खो संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली.
खो-खो हा एक सांघिक खेळ आहे. तरीही प्रत्येक खेळाडूची चपळता आणि मैदानावर तग धरण्याच्या क्षमतेची कसोटी लागते. या दोन्ही पातळ्यांवर काजलने अव्वल स्थान मिळवले आहे. आत्तापर्यंत एकूण 15 सुवर्णपदके मिळवत खो-खोतील सुवर्णकन्या म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली.
हेही वाचा - टीम इंडिया 'पलटवार' करण्यासाठी उत्सुक, विंडीजचे ध्येय मालिका विजय
राजणी गावातील एका सामान्य कुटुंबात काजलचा जन्म झाला. सात मुली आणि आई-वडील असा नऊ लोकांचे तिचे कुटुंब आहे. तिची आई दिव्यांग असल्याने शेतात काबाडकष्ट करणाऱ्या वडिलांना सात बहिणी मदत करतात. आपल्या या परिस्थितीवर मात करण्याची जिद्द काजलच्या मनात होती. तिची हीच जिद्द आणि विश्वास तिला खो-खोच्या खेळात यशाच्या शिखरावर घेऊन गेली.
आई-वडिलांनीही मुलगा नाही म्हणून मुलींमध्ये कधीच भेदभाव केला नाही. त्यांनी उलट मुलींनाच प्रोत्साहन दिले. मुलीने आमचे नाव उज्वल केले. मुलगा नाही म्हणून नाराज न होता मुलगीही प्रगती करू शकते, त्यामुळे मुलीला कधीच 'नकोशी' करू नका, असे काजलचे वडील तुकाराम भोर यांनी सांगितले.
राजणी गावातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत शिक्षण घेत असताना शाळेतील क्रीडाशिक्षकांनी काजल आणि तिच्या मैत्रिणींचे भविष्य घडवले. शिक्षकांचा पाठिंबा आणि स्वत:च्या परिश्रमाच्या जोरावर काजलने राष्ट्रीय संघाचे कर्णधार पद मिळवले आणि दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत देशाला सुवर्णपदक मिळवून दिले.