नंदुरबार - शहरात ४७ व्या राज्यस्तरीय ज्यूनियर ज्युदो स्पर्धेला सुरूवात झाली असून या स्पर्धेत राज्यातील २७ जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. जिल्ह्यात प्रथमच जुडो स्पर्धा होत असल्याने खेळाडूंसह प्रेक्षकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
नंदुरबार येथील मिशन हायस्कूलच्या जिमखान्यात स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत २७ जिल्ह्यातील २५० खेळाडूंनी भाग घेतला आहे. तीन दिवस चालणारी ही स्पर्धा आठ वजन गटांमध्ये खेळवली जाणार असून यातील विजयी स्पर्धकांना लखनऊ येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
आदिवासीबहुल जिल्ह्यात पहिल्यांदाच जुडोच्या राज्यस्तरीय सामने होत असल्याने नागरिकांना या स्पर्धांचे मोठे आकर्षण निर्माण झाले आहे. महत्वाची बाब म्हणजे, या स्पर्धेला राज्यातील नामांकित पंचाची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या स्पर्धेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.