नवी दिल्ली - 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्या दहामध्ये येणे, हे आपले ध्येय असल्याचे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले आहे. आत्तापर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारताची कामगिरी चांगली झालेली नाही. रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने केवळ दोन पदके जिंकली होती. महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने रौप्यपदक तर, महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने देशाला कांस्यपदक मिळवून दिले. पदकतालिकेत भारताला 67वे स्थान मिळाले होते.
महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्राशी इन्स्टाग्रामवर बोलताना रिजिजू म्हणाले, "2024 हे मध्यवर्ती आहे. परंतू 2028 मध्ये विक्रमी पदके जिंकणे हेच माझे ध्येय आहे. जेव्हा मी क्रीडामंत्री झालो तेव्हा माझ्याकडे प्रतिभावंत आणि ऑलिम्पिक विजेते खेळाडू नव्हते. पण 2024 साठी आमच्याकडे संभावित संघ आहे. 2028 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिल्या दहामध्ये येणे हे माझे ध्येय आहे. आमची तयारी सुरू झाली आहे."
ते म्हणाले, "ज्युनियर खेळाडू हे आमचे भावी स्टार आहेत. आम्ही चांगल्या पद्धतीने तयारी सुरू केली आहे. आम्ही 2024मध्ये निकाल पाहू आणि प्रगती करू. पण 2028च्या ऑलिम्पिकमध्ये आपण अव्वल दहामध्ये स्थान मिळवू, हे माझे शब्द लिहून ठेवा."
2012च्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ऑलिम्पिकमधील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. या स्पर्धेत भारताने दोन रौप्य व चार कांस्यपदकांसह सहा पदके जिंकली होती.