नवी दिल्ली - नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने (एनआरएआय) 1 ऑगस्टपासून कर्णी सिंह नेमबाजी श्रेणीतील ऑलिम्पिक खेळाडूंसाठी असणारा अनिवार्य राष्ट्रीय शिबिर स्थगित केला आहे. या श्रेणीतील असलेल्या एका प्रशिक्षकाला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर, हा निर्णय घेण्यात आला आहे.
एनआरएआयचे सचिव राजीव भाटिया यांनी शुक्रवारी सांगितले की, 1 ऑगस्टपासून हे शिबिर होणार नाही. आम्ही नव्या तारखांवर चर्चा करू. पुढील आठवड्यात आम्ही ही घोषणा करू. या शिबिरात अनिवार्यपणे येण्याच्या नियमावर नेमबाज आणि प्रशिक्षकांनी आक्षेप घेतला होता. 8 जुलैपासून ही श्रेणी खुली असल्याने अनेक नेमबाज येथे प्रशिक्षण घेत होते. प्रशिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतरही प्रशिक्षणावर परिणाम होणार नाही, असे भारतीय क्रीडा प्राधिकरणाने सांगितले आहे.
''24 जुलै 2020 रोजी प्रशिक्षकाने केंद्राच्या प्रशासकीय विभागाला भेट दिली होती. प्रशिक्षकाने मैदानाचा दौरा केला नव्हता किंवा ते कोणत्याही प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडूच्या संपर्कात नव्हते. प्रोटोकॉलशी संबंधित सर्व पावले उचलली गेली आहेत. प्रशिक्षण सेंटर स्वच्छ केले आहे आणि नेमबाजांच्या प्रशिक्षणावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जात आहे", असेही प्राधिकरणाने सांगितले आहे.