ठाणे (डोंबिवली) : दिवा गावातील एका चाळीत कुटुंबासह राहणारी सेजल अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीत डोंबिवलीतील क्षितिज संचालित गतिमंद मुलांच्या शाळेत शिक्षण घेत आहे. आतापर्यत सेजलने गुजराथ, झारखंड, नागपूर, पुणेसह अनेक राज्यांतील फ़ुटबाॅल स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून तिने शाळेचेच नव्हे, तर महाराष्ट्र आणि भारताचेसुद्धा नाव उंचावले आहे. तिच्या फुटबाॅल खेळातील ध्येयवादी स्वभावामुळे तिची जर्मनी येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये निवड झाली आहे.
सेजल ही बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग : विशेष म्हणजे लहान असताना दिव्यात राहणारी सेजल जयस्वाल ही दिव्यातीलच एका प्राथमिक शाळेत शिक्षण घेत होती. मात्र, त्या शाळेच्या शिक्षकांच्या सेजल ही बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी डोंबिवलीतील क्षितिज या दिव्यांगांच्या शाळेत पुढील शिक्षण करा, तर तिची प्रगती होईल, असे त्यावेळी तिच्या पालकांना सांगितले.
विविध स्तरावर स्पर्धा खेळत सेजलचे यश : त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी २०१९ साली डोंबिवलीतील क्षितिज गतिमंद शाळेत तिला पुढील शिक्षणासाठी टाकले. त्यानंतर तिची बौद्धिक क्षमता पाहून क्षितिज शाळेने तिला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. सातत्याने तिच्याकडून धावणे, उंच उडी, फुटबॉल या खेळांचा सराव करून घेतला. इतकेच नव्हे तर विशेष मुलांच्या ऑलिम्पिकसाठी तिचा अर्ज भरला. त्यानंतर विविध स्तरावर स्पर्धा खेळत सेजलने यश संपादन केले.
ऑलिम्पिकसाठी तिची ऑनलाईन पद्धतीने निवड : ऑलिम्पिकसाठी तिची सुरुवातीला ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात आली. नंतर ठाणे, पुणे, कोल्हापूर, गुजरात, झारखंड अशा विविध ठिकाणी जाऊन ती सपर्धेत सहभागी झाली. या स्पर्धेत आपले कौशल्य दाखवल्यानंतर तिची ऑलिम्पिकसाठी निवड करण्यात आल्याची माहिती तिच्या शिक्षकांनी दिली. महाराष्ट्रातून दोन दिव्यांग मुलींची यासाठी निवड करण्यात आली असून एक मुलगी नागपूरची असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या जर्मनी येथे होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी ती शाळेच्या मैदानात कसून सराव करत आहे.
सेजल उत्तम खेळाडू आहे याचा मला अभिमान : दरम्यान तिचे वडील दिव्यात रिक्षाचालक असून, आई गृहिणी आहे. सेजल बौद्धिकदृष्ट्या अभ्यासात मागे आहे. मात्र ती उत्तम खेळाडू आहे याचा मला अभिमान आहे असे तिची आई सांगते. तिचे खाणे सांभाळणे आणि प्रकृतीकडे लक्ष देणे माझे कर्तव्य आहे. ते आम्ही करत असून आपली मुलगी काहीतरी करते आहे याचा खूप आनंद झाल्याचे तिच्या आईने सांगितले.
हेही वाचा : Ravindra Jadeja Ball Tampering : रवींद्र जडेजा विरुद्धच्या आरोपांवर टीम इंडियाचे मॅच रेफरींना चोख उत्तर