सांगली - मिरजेतील युवा स्केटिंगपटू आमोद शानबाग याने कोरोनायोद्ध्यांना अभिवादन करण्यासाठी मोठा विक्रम रचला आहे. तेरा वर्षाच्या आमोदने डोळ्यावर पट्टी बांधून 38 मिनिटात पाच किलोमीटरचे अंतर पार केले.
कोरोना पार्श्वभूमीवर अनेक जण आपल्या कलेच्या आणि कौशल्याच्या माध्यमातून कोरोनायोद्ध्यांना अभिवादन करत आहेत. सांगलीतील मिरजेच्या आमोद शानबाग याने आगळ्यावेगळ्या विक्रमाद्वारे हे अभिवादन केले. त्याने मिरजेतील ऑक्सिजन उद्यान या ठिकाणी हा राष्ट्रीय विक्रम नोंदवला. राष्ट्रीय स्तरावर डोळ्यावर पट्टी बांधून कमी वेळेत नोंदवलेला हा विक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.
आपण केलेला विक्रम कोरोनायोद्ध्यांना समर्पित करत असल्याची भावना यावेळी आमोदने व्यक्त केली. या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार आहे. म्युझिक थेरेपीच्या माध्यमातून आमोदला डोळे बांधून हा विक्रम करणे शक्य झाल्याचे त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितले.