परभणी - राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त, परभणी जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने, 'रन फॉर वूमन' ही खास महिलासाठीच्या राजस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खुल्या गटातून नागपूरच्या प्राजक्ता गोडबोले हिने तर लहान गटातून अश्विनी तुरुपझाडे या मुलीने प्रथम क्रमांक पटकावला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा मार्गे वसमत रोडवरील असोला फाट्यापर्यंत १० किलोमीटरची 'रन फॉर वूमन' ही राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा आज (शनिवार) पार पडली. राज्य शासनाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला. या स्पर्धेचे उद्घाटन शिवाजी चौक येथे आमदार मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, दिलीप माने, प्रसिद्ध धावपटू ज्योती गवते, सुभाष जावळे, क्रीडाधिकरी गौतम यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
'रन फॉर वूमन' या स्पर्धेत राज्यभरातील महिलांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये खुल्या गटातून ४३ महिला तर लहान गटात ४१२ मुलींनी सहभाग घेतला. लहान गटाला ५ किलोमीटर आणि मोठ्या गटाला १० किलोमीटर धावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
खुल्या गटातून १० किलोमीटर स्पर्धेमध्ये नागपूरची प्राजक्ता गोडबोले हिने तर लहान गटातून अश्विनी तुरुपझाडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा विद्यार्थी, नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
'या स्पर्ध्येत प्रथम क्रमांक आला याचा मला खूप आनंद झाला. पुरुषांप्रमाणे महिलाही कर्तृत्ववान असतात, हे आम्ही महिला दाखवून देतोय. महिलांनी पुढे येण्यासाठी अशा स्पर्धांची गरज आहे, अशी भावना यावेळी विजेती धावपटू प्राजक्ता गोडबोले हिने व्यक्त केली.