पुणे - प्रो-कबड्डी लीगच्या सातव्या हंगामासाठी पुणेरी पलटनचा संघ सज्ज झाला असून यंदाच्या हंगामात संघाचे नेतृत्व सुरजीत सिंग याच्याकडे देण्यात आले आहे. सुरजीत सिंगने तिसऱ्या हंगामात पुण्याचे प्रतिनिधीत्व केले होते. तर गेल्या वर्षीच्या हंगामात संघाचे नेतृत्व पार पाडणाऱ्या गिरिष एर्नाक याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
येत्या 20 जुलैपासून प्रो-कबड्डीच्या सातव्या हंगामाला सुरूवात होणार आहे. तेव्हा पुणेरी फलटनने यंदाच्या हंगामासाठी कस्सून सराव केला. नवीन लोगोचे अनावरण मार्चमध्ये करण्यात आले होते. त्यानंतर बुधवारी संघातील खेळाडूंसाठी नव्या जर्सीचेही अनावरण करण्यात आले. यंदा पुणेरी पलटन भगव्या रंगात उतरणार आहे.
बुधवारी झालेल्या जर्सी अनावरण सोहळ्यात प्रो-कबड्डीच्या मैदानात आपल्या खेळीने लाखो क्रीडाप्रेमींच्या मनात घर केलेला अनुप कुमार उपस्थित होता. यंदाच्या हंगामात अनुप कुमार पुणेरी पलटन संघाचा मार्गदर्शक असणार आहे. यंदाच्या हंगामान पुणेरी पलटन 22 जुलैला हैदराबादमध्ये हरियाणा स्टीलर्सविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
अशी आहे पुणेरी पलटण -
चढाईपटू - नितिन तोमर, दर्शन कादियान, मनजीत, पवन कुमार कादियान, अमित कुमार, इमाद निया
बचावपटू - शुभम शिंदे, हाजी ताजिक, गिरीश एर्नाक, सुरजीत सिंह, सतपाल, दीपक यादव, जे शाहाजी
अष्टपैलू खेळाडू - अमित कुमार, संदीप, सागर बी. कृष्णा