कराची - कोरोनामुळे पाकिस्तानचे दिग्गज स्क्वॅश खेळाडू आझम खान यांचा लंडनमध्ये मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी रविवारी ही माहिती दिली. मृत्यूसमयी ते ९५ वर्षांचे होते.
आझम यांनी १९५९ ते १९६१ या काळात सलग ब्रिटन ओपनचे विजेतेपद मिळवले होते. गेल्या आठवड्यात त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, यात ते पॉझिटिव्ह आढळून आले. तेव्हा त्यांच्यावर लंडनमधील ईलिंग रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी उशिरा रात्री त्यांचे निधन झाले.
प्रसिद्ध खेळाडू हाशिम खान याचे लहान बंधू असलेले आझम यांची ओळख जगातील सर्वोत्तम स्क्वॅशपटू अशी होती. १९६२ साली त्याच्या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आझम यांनी स्क्वॅश खेळणे बंद केले होते. त्यानंतर त्यांनी दोन वर्षांनी पुन्हा स्क्वॅश खेळण्यास सुरुवात केली होती. पण, त्यांनी मुलाच्या निधनाच्या दुखा:तून मी कधीच बाहेर आलो नाही, असे त्यावेळी सांगितलं.
आझम यांचा जन्म पाकिस्तानमधील पेशावर शहराच्या जवळ नवाकिले या छोट्या गावात झाला होता. १९५६ पासून ते ब्रिटनमध्ये राहत होते. नवाकिले गावात त्यांची आणि त्यांच्या भावांची ओळख स्क्वॅश चॅम्पियन अशी केली जात असे. १९६२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा हार्डबॉल स्पर्धा असलेली युएस ओपनचे विजेतेपद मिळवले होते.
दरम्यान, कोरोनामुळे जगभरात ३० हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्येही याचा शिरकाव झाला आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दोन हजाराच्या घरात गेली आहे.
हेही वाचा - हरभजनने मोदी सरकारला सुनावलं, म्हणाला...
हेही वाचा - क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर, भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याचे होणार पुर्नप्रक्षेपण