नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा कुस्तीपटू सुशील कुमारने आगामी विश्व चम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. ७४ किलो वजनीगटात, त्याने कुस्तीपटू जितेंदर कुमारला ४-२ ने हरवले. या सामन्यानंतर, जितेंदर कुमारचे प्रशिक्षक जयवीर यांनी सुशील कुमारवर गंभीर आरोप केले आहेत.
या दोन्ही कुस्तीपटूंनी हा सामना आक्रमक पद्धतीने खेळला होता. सामन्याच्या दुसऱ्या सत्रात जितेंदरच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर, सुशील कुमारने या घटनेबद्दल माफी मागितली. त्यानंतर सुशीलच्या एका आक्रमक डावामुळे त्याला परत दुखापत झाली. या प्रकारांमुळे जयवीर यांनी सुशील कुमारवर आरोप केले आहेत.
जयवीर म्हणाले, 'सुशीलने मुद्दाम जितेंदरला जखमी केले. कारण त्याला माहित होते की जितेंदर त्याच्यापेक्षा वरचढ आहे. तो आधीपासूनच असे करत आला आहे. २०१२ च्या ऑलिम्पिकमध्ये सुशीलने प्रतिस्पर्ध्याविरुद्ध असेच केले होते. त्याच्यासमोर कोणीच जिंकू नये असे त्याला वाटते.'
या आरोपाचे सुशील कुमारने खंडण केले आहे. सुशील म्हणाला, 'मी मुद्दाम असे केले नाही. जितेंदर माझ्या छोट्या भावासारखा आहे. तो माझी खुप मान ठेवतो आणि मी सुद्धा त्याला तितकाच मान देतो.'