टोकियो - पुढे ढकलल्या गेलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या नवीन तारखांची घोषणा पुढील आठवड्यात होईल, असे टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी सांगितले आहे. मोरी यांनी टेलिव्हिजनवरील एका कार्यक्रमादरम्यान ही माहिती दिली.
मोरी यांनी ३३ आंतरराष्ट्रीय क्रीडा महासंघाला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की खेळ तहकूब झाल्यामुळे झालेला अतिरिक्त खर्च टाळता येणार नाही आणि त्यावर मात करणे आव्हान असेल. या स्पर्धा पुढील वर्षी खेळ जून ते सप्टेंबर दरम्यान खेळवता येतील.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यात चर्चा झाल्यानंतर यंदाची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढलेल्या घटनांमुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी १९१६, १९४० आणि १९४४ मध्ये ही मानाची स्पर्धा जागतिक महायुद्धांमुळे रद्द करण्यात आली होती. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा पुढच्या वर्षी होणार असली तरी, या स्पर्धेला 'टोकियो २०२०' नावानेच ओळखले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.