नवी दिल्ली - हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज देशभरात हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्यानचंद यांना आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मिशन फिट इंडिया'ची घोषणा केली.
राष्ट्रीय क्रीडा दिवस याचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोदी यांनी 'फिट इंडिया' मोहिमेचे महत्त्व समजावून सांगितले. यावेळी त्यांनी खेळाचे नाते निरोगी आयुष्याशी असल्याचे सांगितले. तंदुरुस्तीचं महत्व सांगताना तंत्रज्ञानामुळे शारीरिक श्रम कसे कमी झाले, यावरही त्यांनी भाष्य केले. तसेच त्यांनी या मोहिमेच्या माध्यमातून निरोगी भारताच्या दिशेने पाऊल टाकण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त केला.
पुढे बोलताना मोदी म्हणाले की, 'आम्ही मागील पाच वर्षांमध्ये क्रीडा क्षेत्रात सुधारणा केल्या. याचा फायदा आपल्या दिसून येत आहे. आज विविध खेळात भारतीय खेळाडूंनी पदके जिंकली आहेत. या सर्व खेळाडूंचे मी अभिनंदन करतो. बॅडमिंटन, टेनिस, अॅथलेटिक्स, बॉक्सिंग, कुस्ती आदी आपण चांगले नाव कमावले असून या खेळांमध्ये आपल्या खेळाडूंनी अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांनी जिंकलेल्या प्रत्येक पदकातून त्यांनी केलेले परिश्रम आणि त्याग दिसून येते. यामुळे हा नव्या भारताचा जोश आहे.'
तसेच मोदींनी खेळाचे नाते तंदुरुस्तीशी असून काळानुसार बरेच काही बदल झाले असल्याचे त्यांनी सांगितले. काही दशकांपूर्वी सामान्य व्यक्ती दिवसामध्ये जवळपास १० किलोमीटरपर्यंत चालत असे, मात्र, यामध्ये हळूहळू तंत्रज्ञान आले यात आधुनिक साधने आली आणि चालणे कमी झाले. आता तर तंत्रज्ञामुळे आपले चालणे कमी झाले आणि तेच तंत्रज्ञान आपण किती चालावे हे आपल्याला सांगत असल्याचे मोदी यांनी सांगितले.