नवी दिल्ली - जगातील सात ज्वालामुखी शिखरांवर यशस्वी चढाई करणारे भारतीय गिर्यारोहक सत्यरूप सिद्धांत यांचे नाव 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंदवले गेले आहे. सिद्धांत यांनी सात खंडातील सर्वोच्च ज्वालामुखींवर चढण्याचा अभूतपूर्व पराक्रम केला असून असा विक्रम करणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत.
हेही वाचा - विराटसोबत आता डिव्हिलीयर्सही व्रॉग्न अॅक्टिव्हचा ब्रँड अॅम्बेसेडर
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये सिद्धांत यांनी हा पराक्रम केला होता. पण अलीकडेच त्यांना अधिकृत मान्यता व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी अंटार्टिकाच्या माउंट सिडली या सर्वोच्च उंच ज्वालामुखीवर चढाई केली होती.
आतापर्यंत सिद्धांत यांनी माउंट एव्हरेस्ट, माउंट एकॉनगुआ, माउंट मॅकिन्ले/माउंट डेनाली, माउंट किलीमांजारो, माउंट एल्ब्रास, माउंट ब्लान्क, माउंट व्हिनसन मासिफ, पुनाक जया/कारस्टन्स पिरॅमिड आणि माउंट कोसेन्स्को वर चढाई केली आहे.
सिद्धांत हे पापुआ न्यू गिनी माउंट गिलुवेच्या सर्वोच्च ज्वालामुखीवर चढाई करणारे पहिले भारतीय आहेत. सिद्धांत यांनी मोठे विक्रम केले असले तरी त्यांना केंद्र सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. सिद्धांत यांच्यावर ४५ लाखांचे कर्ज असून अशा परिस्थितीतही ते देशाचे नाव उज्वल करत आहेत.