चंदीगड - भारताचे महान माजी धावपटू मिल्खा सिंह यांचे शुक्रवारी (१८ जून) रोजी निधन झाले. आज त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मिल्खा सिंह यांच्या निधनावर पंजाब सरकारने राज्यात एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.
मिल्खा सिंह यांचे वयाच्या ९१ वर्षीं निधन झाले. 'फ्लाईंग सिख' अशी ओळख असलेले मिल्खा सिंह यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले होते. अचानक ताप आल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांनी मोहालीतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दु:ख
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून मिल्खा सिंह यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मोदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, 'आम्ही एक महान खेळाडू गमावला. मिल्खा सिंह यांनी आपल्या देदिप्यमान कामगिरीच्या जोरावर आपली कल्पनाशक्ती बदलली होती. त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते. लाखो लोकांना त्यांनी प्रेरणा दिली होती. त्यांच्या निधनाने दु:ख झाले.'
मिल्खा सिंह यांच्याविषयी थोडक्यात...
मिल्खा सिंह यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. मिल्खा सिंह यांनी १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत २०० आणि ४०० मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. त्यानंतर त्यांनी १९६२ मधील जकार्ता येथे झालेल्या आशियाई खेळामध्ये ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. १९५९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा - 'फ्लाईग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन; क्रीडा विश्व हळहळले
हेही वाचा - WTC FINAL : टीम इंडियाकडून भर मैदानात मिल्खा सिंहांना अनोखी श्रद्धांजली