न्यूयॉर्क - महान बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन याने नॅशनल बास्केटबॉल लीग (एनबीए) स्पर्धेतील सामन्यादरम्यान घातलेल्या 'एअर जॉर्डन' बुटचा लीलाव सोथबी लिलावगृहात पार पडला. या लिलावामध्ये जॉर्डन याच्या बुटाला तब्बल ५ लाख ६० हजार डॉलर म्हणजे भारतीय चलनात सांगायचे झाल्यास जवळपास ४.२ कोटी रुपयांची बोली लागली. बास्केटबॉलमधील बुटांसाठी ही विक्रमी किंमत आहे.
पांढऱ्या, काळ्या व लाल रंगाचे हे बूट मायकल जॉर्डनसाठी १९८५ मध्ये तयार करण्यात आले होते. महत्वाची बाब म्हणजे, या बुटावर जॉर्डनची स्वाक्षरी आहे. यामुळेच या बुटाला इतकी मोठी बोली लागली.
जॉर्डनच्या बुटांनी 'मून शू'चा विक्रम मोडला. सोथबीच्या जुलै २०१९ मध्ये झालेल्या लिलावामध्ये मून शूसाठी चार लाख ३७ हजार डॉलर किंमत मिळाली होती. दरम्यान, सोथबीला हे बूट एक ते दीड लाख डॉलरला विकले जाण्याची आशा होती, पण लिलावादरम्यान बुटांसाठी त्यापेक्षा अधिक बोली लागली.
जॉर्डन याने वापरलेले एअर जॉर्डन वन हे बुटांचे पहिले मॉडल होते. ते खास मायकल जॉर्डनसाठी तयार करण्यात आले होते. महत्वाची बाब म्हणजे, मायकल जॉर्डनने हे बूट एनबीएच्या आपल्या पहिल्या सत्रादरम्यान वापरले होते.
जॉर्डनने ९० च्या दशकात शिकागो बुल्ससाठी खेळताना सहा एनबीए ट्रॉफी जिंकल्या. याशिवाय तो १९८४ आणि १९९२ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत बास्केटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अमेरिका संघाचा सदस्य होता. जॉर्डन याच्या निवृत्तीनंतर शिकागो क्लबने त्याची २३ नंबरची जर्सी निवृत्त केली.
हेही वाचा - यावर्षी कोणताही भारतीय खेळाडू परदेशी स्पर्धेत भाग घेणार नाही - सुमारीवाला
हेही वाचा - लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात क्रीडा संकुले आणि स्टेडियम उघडणार