मुंबई - राष्ट्रीय प्रशिक्षकाचा सल्ला न ऐकण्याचा प्रकार भारतीय महिला टेबल टेनिसपटू मनिका बत्रा हिला चांगलाच महागात पडणार असल्याचे दिसत आहे. मनिकावर शिस्तभंगाचा ठपका ठेवत भारतीय टेबल टेनिस संघाकडून कठोर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.
काय आहे हे प्रकरण -
मनिका बत्रा खासगी प्रशिक्षक सन्मय परांजपे यांच्यासह टोकियोला पोहोचली होती. परंतु आयोजकांनी सामन्याच्या वेळी खासगी प्रशिक्षकाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली नाही. तेव्हा मनिकाने पुन्हा आपल्या प्रशिक्षकाला उपस्थित राहण्याची परवानगी मागितली. परंतु आयोजकांनी फक्त राष्ट्रीय प्रशिक्षकच सामन्याच्या वेळी हजर राहू शकतात, असे स्पष्ट शब्दात सांगितलं. तेव्हा चिडलेल्या मनिकाने राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांचा सल्ला ऐकला नाही.
आता हे प्रकरण खूपच चर्चेत आहे. यावर भारतीय टेबल टेनिस महासंघाचे महासचिव अरुण कुमार बॅनर्जी यांनी सांगितले की, "मनिकाने शिस्त पाळलेली नाही, त्यामुळे तिच्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे."
जेव्हा स्पर्धा सुरु होती, तेव्हा तिने राष्ट्रीय प्रशिक्षकाचे मार्गदर्शन घेणे अपेक्षित होते. पण तिने हे केलं नाही. काही दिवसांमध्ये टेबल टेनिस महासंघाची बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये मनिकावर कोणती कारवाई करायची, याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच येत्या काही दिवसांतच या प्रकरणाची सत्यताही समोर येईल, असेही बॅनर्जी यांनी सांगितलं.
दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनिका बत्राचे आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले. तिचा पराभव जागतिक क्रमवारीत 17 व्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रियाच्या सोफिया फोलकानोवाने केला. सोफियाने हा सामना 4-0 असा सहज जिंकला. मनिका बत्राला या सामन्यात एकही गेम जिंकता आला नाही.
हेही वाचा - Tokyo Olympics: तलवारबाजीत हरली पण प्रेमात जिंकली! प्रशिक्षकाने खेळाडूला ऑन कॅमेरा केलं प्रपोज
हेही वाचा - IND vs SL : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूला कोरोनाची लागण; भारत-श्रीलंका दुसरा सामना स्थगित