पुणे - म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गतविजेता बाला रफिक शेखसह अभिजित कटकेचे आव्हान संपूष्टात आले. यामुळे यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत शैलेश शेळके आणि हर्षवर्धन सदगीर यांच्यात होणार आहे.
माती विभागातील उपांत्य फेरीच्या लढतीत गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख चितपट झाला, त्याला सोलापूरच्या ज्ञानेश्वर जमदाडे धूळ चारली. मात्र ज्ञानेश्वर जमदाडेला हा विजय माती विभागाच्या अंतिम लढतीत राखता आला नाही. त्याला लातूरच्या शैलेश शेळकेने आस्मान दाखवत, महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
दुसरीकडे गादी विभागात नाशिकचा हर्षवर्धन सदगीर विजयी झाला. त्याने गादी विभागाच्या अंतिम लढतीत २०१८ चा महाराष्ट्र केसरी आणि यंदाचा प्रबळ दावेदार, पुण्याचा मल्ल अभिजीत कटकेला हरवले.
दोनही मल्ल काका पवारचे पठ्ठे -
६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत लातूरचा शैलेश शेळके आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यात होईल. अंतिम लढतीत पोहचलेले दोन्ही मल्ल 'अर्जुन पूरस्कार' विजेते कुस्तीपटू आणि प्रशिक्षक काका पवार यांच्या तालमीत तयार झालेले आहेत.
आपल्याच दोघा मल्लात लढत होत असल्याने काका पवार यांना विशेष आनंद असून दोन्ही मल्ल तोडीसतोड आहेत. अंतिम लढतीत जो चांगला खेळ करेल, तो विजयी होईल आणि कोणीही जिंकलं तरी मला आनंदच असेल, असे काका पवार यांनी सांगितले.
अंतिम लढतीत पोहोचलेल्या मल्लानी आपण खेळावर लक्ष देणार असून हारजीतचा विचार करणार नाही, असे सांगितले आहे. उद्या (मंगळवार) होणाऱ्या अंतिम लढतीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.