नवी दिल्ली - भारताच्या बॉक्सिंगपटूंनी रशियात झालेल्या उमाखानोव स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत भारताचे नाव उंचावले आहे. महिलांमध्ये लवलिना बोरगोहा आणि नीरज यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. लवलिनाने ६९ तर नीरजने ५७ किलो वजनी गटात ही कामगिरी केली आहे.
लवलिनाने अंतिम सामन्यात इटलीच्या असुंटा कॅनफोराला ३-२ ने हरवत सुवर्णपदक जिंकले. याच कॅनफोरानो इंडिया ओपनमध्ये लवलिनाला हरवले होते. तर, दुसऱ्या गटात, नीरजने मलिका शाखीडोवाला ३-० ने धूळ चारली.
पुरुष वर्गात, गौरव सोलंकीचा अंतिम सामन्यात पराभव झाल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले . उझबेकिस्तानच्या शाराखामाटोवने त्याचा ०-५ ने पराभव केला. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलेली पूजा रानीला ७५ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे पूजाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले . या स्पर्धेत भारताने २ सुवर्णपदके, १ रौप्यपदक आणि ३ कांस्यपदके पटकावली आहेत.