गुवाहाटी - खेलो इंडिया युथ गेम्समध्ये जिम्नॅस्टिक्स प्रकारात महाराष्ट्राची अस्मी बडदेने जबरदस्त कामगिरी केली आहे. तिने या स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात आतापर्यंत ४ सुवर्णपदकांची कमाई केली आहे.
गुवाहाटीच्या भोगेश्वरी फुकनानी स्टेडियमध्ये खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धा रंगली आहे. यात अस्मीने शुक्रवारी रिदमिक सर्वसाधारण प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामध्ये तिने आज (शनिवार) चेंडू, दोरी व रिबन प्रकारातील सुवर्णपदकांची भर घातली.
क्लब रँक प्रकारात मात्र, अस्मीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या प्रकारात श्रेया बंगाळे हिने तिला मागे टाकून सोनेरी कामगिरी केली. श्रेयाने दोरी प्रकारात रौप्यपदक तर चेंडू प्रकारात ब्राँझपदक पटकाविले.
मुलांच्या समांतर बार प्रकारात १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या ओंकार धनावडेने रौप्य पदक जिंकले. तर आर्यन नहातेने ब्राँझ पदकाची कमाई केली. या प्रकारात उत्तर प्रदेशचा जतीन कनोजियाने १२.३० गुणांसह सुवर्णपदक पटकाविले.
हेही वाचा - खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राची सुवर्ण कामगिरी
हेही वाचा - महाराष्ट्र केसरी: दोस्तीत दोस्ती कुस्तीत कुस्ती...! हे फक्त महाराष्ट्रात घडू शकतं