नवी दिल्ली - या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या दुसऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे (केआययूजी) आयोजन कर्नाटक करणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी ही घोषणा केली.
भारतीय विद्यापीठ असोसिएशनच्या भागीदारीत बंगळुरूतील जैन विद्यापीठ आणि राज्यातील इतर ठिकाणी हे खेळ आयोजित केले जातील. विद्यापीठ स्तरावर आयोजन केला जाणारा केआययूजी ही देशातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करू शकणाऱ्या गुणवान खेळाडूंना शोधणे, हे या स्पर्धेचे ध्येय आहे. फेब्रुवारी २०२०मध्ये केआययूजीचा पहिला टप्पा मध्ये भुवनेश्वरमध्ये पार पडला होता. यावर्षी योगासन आणि मल्लखांब या खेळांना गेम्समध्ये जोडले गेले आहे.
या प्रकारांच्या समावेशासह, यावर्षी खेळाडूंच्या सहभागाची संख्या ४००० एवढी पार करणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त, जागतिक विद्यापीठाच्या क्रीडा मानदंडांनुसार २५ वर्षांखालील वयोगटात खेळ घेण्यात येतील. रिजिजू म्हणाले, "गेल्या वर्षी ओडिशामधील स्पर्धा खूप यशस्वी झाली. ज्या देशांचे खेळाडू चमकदार कामगिरी करतात ते अनेकदा जागतिक विद्यापीठ स्तरावरील नायक असतात."