लॉसने - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) पुढच्या वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी नवीन पात्रता प्रक्रिया जाहीर केली. 29 जून 2021 ही ऑलिम्पिक पात्रतेसाठी अंतिम तर, 5 जुलै 2021 ही अंतिम प्रवेश तारीख असेल, असे आयओसीने सांगितले आहे.
यावर्षी 24 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित केली गेली होती, परंतु कोरोनाव्हायरसमुळे ती एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा तहकूब करण्याची घोषणा होईपर्यंत एकूण 57 टक्के पात्रता पूर्ण झाली होती. पुढच्या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत घेण्यात येणार आहे.
अॅथलेटिक्स, सायकलिंग, वेटलिफ्टिंग, बास्केटबॉल, ज्युडो, रोइंग, स्विमिंग, बॅडमिंटन, स्कॅडबोडिरंग, तायक्वांदो आणि कुस्तीसाठी पात्रता प्रणालीत किरकोळ बदल करण्यात आले आहेत. तर, तिरंदाजी, कलात्मक पोहणे, बास्केटबॉल, बास्केटबॉल 3x3, बॉक्सिंग, डायव्हिंग, फेन्सिंग, फुटबॉल, गोल्फ, जिम्नॅस्टिक, हँडबॉल, कराटे, मॅरेथॉन स्विमिंग, आधुनिक पँथालन, रग्बी, सेलिंग, नेमबाजी, स्पोर्ट क्लाइम्बिंग, सर्फिंग, टेबल टेनिस, ट्रायथलॉन आणि वॉटर पोलोन यांनी पात्रता प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे.