नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात येत आहेत. जपानचे पंतप्रधान शिंजो आबे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांच्यात चर्चा झाल्यानंतर यंदाची टोकियो ऑलिम्पिक स्पर्धाही एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) या निर्णयाचे स्वागत केले आहे.
हेही वाचा - कपिल देवचं होम ग्राऊंड आता होणार कारागृह!
'लॉकडाऊन संपल्यानंतर खेळाडू, राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन (एनएफएस) आणि इतर भागधारकांसह आम्ही बैठक घेणार असून योजनांवर पुनर्विचार करणार आहोत. आजच्या निर्णयानंतर आमचे खेळाडू काळजींमुळे सुटकेचा श्वास घेतील', असे आयओएने निवेदनात म्हटले आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी १९१६, १९४० आणि १९४४ मध्ये ही मानाची स्पर्धा जागतिक महायुद्धांमुळे रद्द करण्यात आली होती. यंदाची ऑलिम्पिक स्पर्धा पुढच्या वर्षी होणार असली तरी, या स्पर्धेला 'टोकियो २०२०' नावानेच ओळखले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.