नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या भीतीमुळे टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीत असलेल्या खेळाडूंचा त्रास वाढला आहे. ऑलिम्पिक पात्रतेसाठी तयारी करत असलेल्या ग्रीको-रोमन कुस्तीपटूंचा संघ बाकू (अझरबैजान) मध्ये अडकला आहे. अझरबैजान सरकारने कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी तातडीने ऑलिम्पिकच्या सरावासाठीचे शिबिर बंद केले. ज्यामुळे भारतीय संघ तिथल्या हॉटेलमध्ये कैद झाला आहे.
हेही वाचा - रांची गाठताच धोनीने केली 'बाईक-सवारी'...पाहा व्हिडिओ
या घटनेसंदर्भात रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया क्रीडा मंत्रालयाशी चर्चा करत आहे. शिवाय, या १३ खेळाडूंच्या संघाची परतीची व्यवस्थाही करत आहे. अझरबैजानमधील शिबीर २१ मार्चपर्यंत सुरू राहणार होते, मात्र कोरोनाच्या प्रकोपामुळे हे रद्द करण्यात आले आहे.
ऑलिम्पिकच्या तयारीसाठी कुस्ती संघटनेने लखनऊ आणि सोनीपत येथील महिला व पुरुष फ्री स्टाईल कुस्तीगीरांचे शिबीरही बंद केले आहेत. दुसरीकडे असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीने (एआययू) १० ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी टूर्नामेंट्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.