भंडारा - पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रमाणे, पूर्व विदर्भात देखील कुस्तीला चालना मिळाली, यासाठी भंडारा जिल्ह्याच्या काटी गावात मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या राज्यातील पुरूष व महिला कुस्तीपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. दरम्यान, या स्पर्धेचे आयोजन मागील तीन वर्षांपासून करण्यात येत असून कुस्तीपटू कैलास मते यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
काटी गावातील कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद हरियाणाच्या संदीप तोमरने पटकावले. त्याला मानाची चांदीची गदा आणि दुचाकी गाडी बक्षिस म्हणून देण्यात आले. तर कोल्हापूरचा अक्षय मागवडी उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. मोहाडी तालुक्यात आयोजित करण्यात आलेली स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील वयोवृद्ध, तरुण वर्ग यांच्यासह महिला वर्गांनेही मोठी गर्दी केली होती.
कुस्ती हा खेळ प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो. त्या तुलनेत विदर्भात कुस्ती खेळण्याचे प्रमाण कमी आहे. यामुळेच आतापर्यंत विदर्भातील एकाही मल्लाने महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकलेली नाही.
विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि नागपूर या जिल्ह्यात कुस्तीला चालना मिळावी, यासाठी काठी गावातील कैलास मते या तरुणाने दोन दिवसीय गादीवरील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते.
काटी येथील कुस्ती स्पर्धेत पुरुष गटात ३५ ते ७० किलो वजन गटातील मल्लानी सहभाग घेतला होता. तर महिलांच्या गटात ३५ ते ५५ किलो वजन गटात महिला मल्लांनी कुस्ती लढली.
दरम्यान, या स्पर्धेच्या माध्यमातून शासनाने देखील विदर्भात कुस्तीपटूंना चालना देण्यासाठी प्रयत्न करावे, अशी भावना कुस्तीपटूंनी व्यक्त केली आहे.