मुंबई - भारताला आणखी तीन ऑलिम्पिक कोटा मिळाले आहेत. युवा जलतरणपटू श्रीहरी नटराज, धावपटू द्युती चंद आणि महिला थाळीफेकपटू सीमा पुनिया यांचे टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट पक्के झाले आहे.
भारताचा युवा जलतरणपटू श्रीहरी नटराज टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. जागतिक जलतरण महासंघाने रोम येथे झालेल्या सेटे कॉली ट्रॉफी स्पर्धेतील १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेतील त्याच्या वेळेला 'अ' पात्रता निकषाची मान्यता दिली. त्यामुळे नटराज याचे ऑलिम्पिक खेळण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. दरम्यान, श्रीहरी आधी भारताचा साजन प्रकाश याने देखील टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. प्रथमच भारताचे दोन जलतरणपटू थेट एन्ट्रीसह ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत.
भारतीय जलतरण महासंघाने श्रीहरी नटराज विषयी ट्विट केले आहे. यात त्यांनी सांगितलं की, श्रीहरी नटराज याने सेटे कोली ट्रॉफी स्पर्धेत टाईम ट्रायल दरम्यान ५३.७७ सेंकदाचा वेळ घेतला. त्याच्या वेळेला 'अ' पात्रता निकषाची मान्यता मिळाली. श्रीहरीच्या आधी भारताचा जलतरणपटू साजन प्रकाश देखील सेटे कॉली ट्रॉफी स्पर्धेत पुरूषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १ मिनिट ५६.३८ सेकंदाची वेळ घेत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे.
धावपटू द्युती चंदही टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
भारतीय धावपटू द्युती चंद हिला जागतिक क्रमवारीनुसार टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत १०० व २०० मीटर शर्यतीचे तिकीट मिळाले आहे.
थाळीफेकपटू सीमा पुनियाने मिळवलं तिकिट -
भारताची अनुभवी थाळीफेकपटू सीमा पुनिया हिने आंतरराज्य अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दमदार कामगिरी करत टोकियो ऑलिम्पिकचे तिकिट मिळवले. पुनियाने ६३.७० मीटर थाळीफेक करत ऑलिम्पिकचा पात्रता निकष पार केला. सीमा चौथ्यांदा ऑलिम्पिसाठी पात्र ठरली आहे. यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी सीमा भारताची दुसरी थाळीफेकपटू आहे. याआधी कमलप्रीत कौर ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे.
हेही वाचा - 'खेलरत्न'साठी BCCI करणार मिताली राज, रविचंद्रन अश्विनच्या नावाची शिफारस
हेही वाचा - आदिती अशोक ठरली Tokyo Olympics साठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला गोल्फपटू