चेन्नई : युक्रेन आणि रशिया हे दोन देश एकमेकांवर हल्ले ( Ukraine-Russia war ) करत असल्याने जगभरात तणावाचे वाताावरण निर्माण झाले आहे. तसेच यामुळे युक्रेनमधील बऱ्याच लोकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. माजी भारतीय राष्ट्रीय जलद बुद्धिबळ चॅम्पियन अन्वेश उपाध्याय ( Chess Champion Anvesh Upadhyay ) येथे अडकला होता. आता तो राजधानी कीव सोडून पोलंडच्या सीमेला लागून असलेल्या ल्विव्ह शहरात पोहोचण्यात यशस्वी झाला आहे.
रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेल्या ( Indians stranded in Ukraine ) अनेक भारतीयांपैकी हा 30 वर्षीय खेळाडू आहे. सुमारे 10 तासांच्या ट्रेन प्रवासानंतर तो पश्चिम युक्रेनमधील ल्विव्ह शहरात पोहोचला. एक दिवस विश्रांती घेऊन भारतात जाण्याचा विचार करत असल्याचे अन्वेशने सांगितले.
अन्वेश उपाध्याय पीटीआय ( Anvesh Upadhyay told PTI ) सोबत बोलताना म्हणाला, "मी एक दिवस विश्रांती घेईन आणि नंतर भारतात पोहोचण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पार पाडेन. मी माझ्या पालकांच्या सतत संपर्कात आहे. यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळत आहे. तसेच भारतीय दूतावास जे काही सल्ले देत आहे, मी त्याचे पालन करत आहे.” माजी भारतीय राष्ट्रीय जलद बुद्धिबळ चॅम्पियन अन्वेश उपाध्याय हा 2012 मध्ये ते वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी युक्रेनला गेला होता.