गुवाहाटी - भारताची आघाडीची महिला धावपटू हिमा दासची यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. आसाम सरकारने यंदाच्या वर्षासाठी हिमा दासचे नाव पाठवले आहे. आसाम क्रीडा विभागाचे सचिव दुलाल चंद्र दास यांनी हिमाच्या नावाची शिफारस करणारे पत्र केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला पाठवले आहे. दुसरीकडे महिला बॉक्सर लोव्हलीना बोरगोहैन हिचे नाव अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आले आहे.
हिमा दास २०१८ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर धडाकेबाज कामगिरी करत आहे. यामुळे तिची खेलरत्न साठी शिफारस करण्यात आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, हिमा यंदाच्या वर्षातील खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये सर्वात तरुण उमेदवार आहे.
आसामचे क्रीडा पदाधिकारी धर्मकांत यांनी सांगितले की, 'क्रीडा सचिव दुलाल चंद्र दास यांनी खेलरत्नसाठी हिमा आणि अर्जुनसाठी लोव्हलीना यांची शिफारस केली आहे. हिमा आणि लोव्हलीना या दोघी आसामच्या प्रेरणा आहेत. जर केंद्र सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला तर आसाम सरकार आणि आसामच्या जनतेसाठी सर्वात आनंदाची गोष्ठ ठरेल.'
दरम्यान, यंदाच्या वर्षासाठी हिमा दोससोबत, भालाफेकपटू नीरज चोप्रा, कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल, क्रिकेटपटू रोहित शर्मा यांची नावेही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहेत.
हिमाने २०१८ आणि २०१९ या वर्षात चांगली केली आहे. तिने अंडर २० विश्व स्पर्धा जिंकली आहे. तसेच जकार्ता अशियाई स्पर्धेत तिने ४०० मीटरमध्ये रौप्य तर ४०० रिले स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. हिमाला याआधी २०१८ साली अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
हेही वाचा - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर क्रीडाविश्वात हळहळ
हेही वाचा - भालाफेकपटू दविंदरसिंग कंगला डोपिंगप्रकरणात मिळणार क्लीन चिट?