काठमांडू - येथे सुरू असलेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने १४ पदके जिंकली. यात तीन सुवर्ण पदके, आठ रौप्य पदके आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताने तायक्वांदो स्पर्धेत नऊ पदके जिंकली. तसेच भारताच्या पुरुष खो-खो संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
हेही वाचा - कोणत्याही पुरूषाला जमलं नाही ते महिलेनं केलं, एकही धाव न देता घेतले 6 बळी!
बॅडमिंटनमध्ये किदाम्बी श्रीकांतच्या नेतृत्वात भारतीय पुरुष संघाने अंतिम सामन्यात श्रीलंकेला ३-१ ने नमवून सुवर्णपदक जिंकले. त्याचबरोबर महिला बॅडमिंटन संघाने विजेतेपदाच्या सामन्यात श्रीलंकेला ३-० ने हरवून सुवर्णपदक जिंकले आहे.
आपला विजयी रथ पुढे हाकताना भारताच्या पुरुष खो-खो संघाने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय संघाने यजमान नेपाळला डाव आणि १२ गुणांनी पराभूत केले.