मुंबई - कोरोनामुळे क्रीडा विश्वातील सर्व स्पर्धा ठप्प आहेत. अशात भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. भारतामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय बॉक्सिंग महासंघाचे (बीएफआय) कार्यकारी संचालक आर. के. सचेती यांनी सांगितले की, 'आशियाई बॉक्सिंग महासंघाच्या बैठकीनंतर स्पर्धेच्या आयोजनाचे हक्क आम्हाला फेब्रुवारी महिन्यातच मिळाले होते. नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात या स्पर्धेचे आयोजन होणार असून तोपर्यंतच सर्व गोष्टी पूर्वपदावर येतील, अशी आम्हाला आशा आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच ही स्पर्धा घेण्याच्या बाबतीत अंतिम निर्णय घेतला जाईल.'
दरम्यान, यापूर्वी १९८० मध्ये मुंबईत पुरुषांच्या आशियाई स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. तर हिसार येथे २००३ मध्ये महिलांची स्पर्धा झाली होती. नोव्हेंबपर्यंत कोरोनाचे संकट संपुष्टात येईल, अशी आशा भारतीय बॉक्सिंग महासंघाला (बीएफआय) आहे. यामुळे या स्पर्धेचे आयोजन नोव्हेंबर महिन्यात करण्यात आले आहे. तसेच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धाना नोव्हेंबरपासून सुरुवात होईल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचा आहे.
हेही वाचा - 'ऑनलाईन' खेळून भारतीय बुद्धिबळपटूंनी जमवला 'इतका' निधी
हेही वाचा - कोरोना रुग्णांसमोर पाकिस्तानी डॉक्टर्सचा डान्स; गंभीरने शेअर केला व्हिडिओ