नवी दिल्ली - आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम दिवशी भारतीय कुस्तीपटू जितेंद्र कुमारने रौप्यपदक पटकावले. जितेंद्रने ७४ किलो वजनी गटातील फ्री स्टाईल प्रकारात ही कामगिरी केली. तर, महाराष्ट्राच्या राहुल आवारेला ६१ तर, दीपक पुनियाला ८६ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळाले आहे. या स्पर्धेत भारतीय कुस्तीपटूंनी एकूण २० पदके पटकावली असून भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
हेही वाचा - INDvsNZ १st TEST : पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा भारतावर १० गडी राखून विजय
भारतीय कुस्तीगीरांनी ग्रीको रोमन प्रकारात एक सुवर्ण व चार कांस्यपदके, महिला विभागात तीन सुवर्ण, दोन रौप्य व तीन कांस्यपदके तर पुरुष फ्रीस्टाईल प्रकारात एक सुवर्ण, चार रौप्य व दोन कांस्यपदके जिंकली आहे.
चॅम्पियनशिपच्या सहाव्या आणि शेवटच्या दिवशी जितेंद्र कुमारला कझाकिस्तानचा गतविजेता कुस्तीपटू दानियार कैसानोवकडून मात खावी लागली. तर, इराणच्या दस्तान माजिदने राहुल आवारेला ५-२ असे हरवले. इराकच्या अल ओबैदी इसा अब्दुलसलामने ८६ किलो वजनी गटात दीपक पुनियाला १०-० असे हरवले आहे.