चेन्नई - इंटरनेट कनेक्शन आणि सव्र्हरमधील बिघाडाचा फटका ऑनलाइन फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेला बसला. रशियाविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पहिली फेरी बरोबरीत सुटली. दुसऱ्या फेरीत इंटरनेट कनेक्शनमध्ये बिघाड झाल्याबाबत भारताने दाद मागितली. तेव्हा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (फिडे) भारत आणि रशिया या दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले. दरम्यान, भारताचे हे पहिलेच ऑलिम्पियाडमधील पहिलेच सुवर्णपदक आहे.
अंतिम लढतीत भारत रशियाकडून १.५-४.५ असा पराभूत झाला. अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या पटावर दिव्या देशमुख, निहाल सरीन यांच्या लढतींना इंटरनेट कनेक्शनचा फटका बसला. वेळेच्या बंधनामुळे त्यांना ही लढत गमवावी लागली. दुसरीकडे तिसऱ्या पटावर खेळणाऱ्या कोनेरू हम्पीलाही इंटरनेटचा फटका बसला. त्यावर भारतीय संघाने 'फिडे'कडे दाद मागितली आणि या संदर्भातील परिस्थितीचा आढावा घेणाऱ्या समितीने दोन्ही देशांना संयुक्त विजेतेपद घोषित करण्याचा निर्णय घेतला.
भारताचे ऑलिम्पियाड स्पर्धेतील हे पहिला सुवर्णपदक आहे. या स्पर्धेत भारताने गतविजेत्या चीनवर ४-२ अशी मात केली होती. विदिथ गुजरातीने भारतीय संघाचे नेतृत्व केले. महत्वाचे म्हणजे, विश्वनाथन आनंद, पेंटाल्या हरिकृष्ण असे मातब्बर संघात असूनही हा मान विदिथला मिळाला होता. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा ऑनलाइन खेळवण्यात आली. त्यामुळे खुला गट व महिला गट अशी स्वतंत्र विभागणी करण्यात आलेली नव्हती. त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे, युवा बुद्धिबळपटूंचाही प्रत्येक संघात समावेश करण्यात आला होता.
हेही वाचा - राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्याला १४ खेळाडू राहणार अनुपस्थित
हेही वाचा - राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांच्या बक्षीस रकमेत वाढ, खेलरत्नप्राप्त खेळाडूंना मिळणार 'इतके' लाख