नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा बदल केला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत रोहित शर्मा आता ७८६ रेटिंग गुणांसह ८व्या स्थानावर पोहचला आहे. कसोटी क्रमवारीत विराट कोहली 16व्या क्रमांकावर घसरला आहे. पण, ऋषभ पंतने आयसीसी क्रमवारीत पुढील स्थान पटकावले आहे. पंत पहिल्या दहा भारतीय फलंदाजांच्या यादीत आला आहे. ऋषभ पंत 789 रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत 7 व्या स्थानावर आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली 665 रेटिंग गुणांसह कसोटी क्रमवारीत 16व्या स्थानावर पोहचला आहे.
ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन पहिल्या स्थानावर : आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन ९२१ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ ८९७ रेटिंग गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. याशिवाय पाकिस्तानी क्रिकेटर बाबर आझम 862 रेटिंग पॉइंट्ससह टॉप 3 मध्ये आहे. ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड ८३३ रेटिंग गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. ऋषभ पंत आणि रोहित शर्मा हे दोन भारतीय खेळाडू कसोटी क्रमवारीत पहिल्या 10 जणांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.
आयसीसी क्रमवारीतील 10 फलंदाजांची यादी : आयसीसी (ICC) कसोटी क्रमवारीत शीर्ष 10 फलंदाज : 1) मार्नस लॅबुशेन- ऑस्ट्रेलिया, २) स्टीव्ह स्मिथ - ऑस्ट्रेलिया, 3) बाबर आझम - पाकिस्तान, 4) ट्रॅव्हिस हेड - ऑस्ट्रेलिया, 5) जो रूट - इंग्लंड, 6) केन विल्यमसन - न्यूझीलंड, 7) ऋषभ पंत - भारत, 8) रोहित शर्मा - भारत, 9) दिमुथ करुणारत्ने - श्रीलंका, 10) उस्मान ख्वाजा - ऑस्ट्रेलिया
दुसरा कसोटी सामना दिल्लीत होणार : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळवला जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया चांगली कामगिरी करीत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा कसोटी सामना शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत बाजी मारण्याचा प्रयत्न करणार आहे.
आयसीसीला मागावी लागली माफी : भारतीय संघासाठी काल मोठा आनंदाचा क्षण होता. पण, भारताचा हा आनंद काही क्षणांपुरता होता. खुद्द आयसीसीकडून भारतीय संघाला हा धक्का मिळाला आणि यामुळे एकच सोशल मीडियावर गदारोळ माजला होता. याचे कारण म्हणजे बुधवारी काही तासांसाठी भारतीय संघ कसोटी गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर आला होता. खरं तर, आयसीसीच्या तांत्रिक चुकीमुळे, बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी कसोटी क्रमवारीत टीम इंडिया जगातील अव्वल क्रमांकाचा संघ बनल्यानंतर अवघ्या ६ तासांत दुसऱ्या क्रमांकावर घसरला. आयसीसीच्या चुकीमुळे टीम इंडिया कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळाले होते. मात्र, अडीच तासांतच आयसीसीच्या चूक लक्षात आली अन् त्यांनी पुन्हा ऑस्ट्रेलिया अव्वल क्रमांक दिला. महिन्याभरात दुसऱ्यांदा आयसीसीने अशी चूक करून 'आयसीसी'ने आपले हसू करून घेतले आहे.