नवी दिल्ली - कोरोनाच्या उद्रेकामुळे कोणताही भारतीय खेळाडू परदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेणार नाही, असे इंडियन अॅथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचेही सुमारीवाला यांनी सांगितले. या निर्णयामुळे 14 ऑगस्टपासून सुरू होणार्या प्रतिष्ठित डायमंड लीग स्पर्धेत भारतीय खेळाडू भाग घेऊ शकणार नाहीत.
टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि शिवपाल सिंग यांनाही भाग घेता येणार नाही. 2021 पूर्वी आमच्या खेळाडूंना परदेशात पाठवणार नाही, असे सुमारीवाला यांना वर्ल्ड अॅथलेटिक्सचे प्रमुख सेबस्टियन को यांच्यासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सांगितले.
ते म्हणाले, ''आमच्या खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे. म्हणून, आमचा कोणताही खेळाडू डायमंड लीगमध्ये भाग घेणार नाही. सध्या राष्ट्रीय शिबिरात असलेले खेळाडू पुढील तीन महिने तिथेच थांबतील.''
एएफआय प्रमुख पुढे म्हणाले, "12 सप्टेंबरपासून सुरू होणार्या भारतीय सर्किटच्या पाच स्पर्धांमध्ये खेळाडूंनी भाग घ्यावा अशी आमची योजना आहे. त्यांना ऑक्टोबरनंतर विश्रांती घेण्याची संधी मिळेल. जर परिस्थिती सुधारली तर पुढच्या वर्षी आम्ही युरोपमध्ये प्रशिक्षण घेण्याची योजना आखली आहे जेणेकरून ऑलिम्पिकमध्ये खेळाडू सर्वोत्कृष्ट कामगिरी करू शकतील''