शिमला - हिमाचल प्रदेश सरकार बीर-बिलिंगमध्ये पॅराग्लायडिंग केंद्र उभारणार आहे. २०१५ मध्ये येथे भारतातील पहिला पॅराग्लायडिंग वर्ल्डकप आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी मंगळवारी विधानसभेत ही माहिती दिली.
काँग्रेसचे सदस्य आशिष बुटैल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकूर म्हणाले, की राज्यात सध्या राष्ट्रीय पॅराग्लायडिंग स्कूल सुरू करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ''पर्यटन मंत्रालय कांग्रा जिल्ह्यातील बीरमध्ये पॅराग्लायडिंग केंद्र उभारणार आहे. यासाठी जागा निवडली गेली असून कामही सुरू केले गेले आहे.''
पॅराग्लायडिंग सेंटरसाठी आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जगातील चौथे सर्वोत्कृष्ट पॅराग्लाइडिंग स्थळ म्हणून बीर-बिलिंगची ओळख होती. जगभरातून अनेक पॅराग्लायडर्स येथे येतात. कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊननंतर राज्य सरकारने जुलैपासून पॅराग्लायडिंगला परवानगी दिली आहे.